"बुवांनी संगीत गावोगावी पेरले. शास्त्रीय संगीताच्या मैफलींसाठी ते जिथे बोलावणे येईल तिथे जायचे. मग बीदागी किती, व्यवस्था कशी, याकडे दुर्लक्ष करीत शास्त्रीय संगीताचा प्रसार केला. आज मी एका अर्थाने तोच प्रयत्न करतोय. माझे स्फूर्तिस्थान बुवा असल्यामुळे मीही माझ्या परीने प्रमाणिक प्रयत्न करतो आहे. गाणे शिकविताना ते रुजविण्याचाही प्रयत्न सुरु आहे. संगीत आणि संगीत शिकवणे या दोन वेगळ्या कला आहेत. गाणे समजावून सांगण्यासाठी आधी ते आत्मसात करावे लागते. ते साठवावे लागते, मग ते आठवत समोरचा शिकणारा कसा आहे, त्याच्या कुवतीनुसार ते त्याच्यापर्यंत पाझरावे यासाठी ते नीट रुजविण्याचा प्रयत्न करतोय."
गेली दहा वर्ष संगीताचा परदेशात सुरू असलेला प्रवास ऐकवत होता महेश काळे. खरे तर तो पुण्याचा, नाही खास पुण्याचाच. वडील महाराष्ट्र बॅंकेत. सुमारे ६-७ वर्ष पं. जितेंद्र अभिषेकीकडे गाण्याचे धडे गिरवणारा महेश आज अमेरिकेत सुमारे १०० - १५० विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे धडे देतोय. यात अनेक वयोगटातील मुलांचा समावेश आहे. कुणी प्राथमिक तर कुणी पुढच्या शिक्षणासाठी महेश काळेकडे आज रागदारीचे शिक्षण घेत आहेत. जर शिष्य भारतात असला तर Webcam वरून Internet च्या माध्यमातून ठरलेल्या दिवशी काळ्यांची पाठशाळा भरत असते. ते मी अनुभवले आहे. ठरलेल्या दिवशी गुरू नेटवर हजर असतो. कुणाचे किती पाठ झालेय, कुणाचा स्वर कसा लागतोय, बंदीश का रचतात, त्याचा अर्थ काय, संगीताचे वैशिष्ट्य काय... या सा-या प्रश्नांची उत्तरे महेश काळे देत असतात.

राहूल देशपांडे यांनी जेव्हा 'कट्यार' नव्याने करायचे ठरविले तेव्हा सदाशिवची भूमिका महेश काळे यांनी करायची हे ठरल्यासारखे होते. त्यासाठी काही काळ महेश भारतात होता.
पाठांतर, तालीम आणि मग प्रयोग करताना शास्त्रीय संगीत शिकवण्याची बैठक सुटली नाही. ती सुरूच होती. महेश काळेंच्या कट्यारमधल्या सदाशिवच्या भूमिकेने हे नाव नाटक आणि संगीत क्षेत्राला सुपरिचित झालेय.
पं. अभिषेकींच्या गायकीचे संस्कार सदाशिवच्या मुखातून जेव्हा बाहेर पडतात तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होतो.
महेश काळे यांनी व्हीआयटीमधून बीई (ईलेक्ट्रानिक्स) झाल्यानंतर २००१ मध्ये प्रथम पुणे सोडले. नंतर युनिवर्सिटी ऑफ कैलिफोर्निया, सांटाबारबाराला MULTI MEDIA ची उच्चपदवी संपादनासाठी अमेरिकेला गेले. ते आजही तिकडेच आपला तळ भक्कम करून संगीताची सेवा करत आहेत. त्यातूनच ठामपणे आपले पाय पक्के रोऊन संगीत साधना करण्यात आणि शिकवण्यात गुंतून गेलेत. मध्यंतरी बरेच दिवस विविध अनुभव घेतले. अखेर आता ठरवून नोकरीकडे पाठ फिरवली. केवळ संगीताच्या शिकवण्या घेत संगीताची सेवा देण्यात रमुन गेलेत. त्याची ही यशोगाथा....

वयाच्या तिस-या वर्षी आपल्या बाबांसोबत गोंदावल्यात छोट्या महेशनी पाच हजार लोकांसमोर अभंग सादर करून पहिली दाद मिळविली. आजही त्यांना ती आठवण प्रकर्षाने येते. पहिली गुरु आई. आरंभीचे गायनाचे प्राथमिक धडे पुरूषोत्तम गांगुर्डे यांचेकडे घेतल्यावर १९९१ ला पं. जितेंद्र अभिषेकींकडे गुरूकूल पध्दतीने सुमारे ६-७ वर्षे गायनाचे शास्त्रीय ज्ञान घेतले. अभिषेकी बुवांकडे पारंपारीक शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि नाट्यसंगीताचे शिक्षण घोटून घेतले गेले.
आजही महेश काळे यांच्या गळ्यावर अभिषेकी बुवांची छाप आहे असे महटले तर वावगे ठरणार नाही.
अभिषेकींबरोबर साथ करताना स्वतःच्या स्वतंत्र गायनाच्या मैफली झडतच होत्या. याशिवाय प्रभाकर कारेकर, श्रीधर फडके, सुरेश वाडकर, आनंद मोडक यांच्याबरोबर तर कधी त्यांच्या कार्यक्रमातून गाण्याचा योग आला. एका बाजूला इंजीनियरिंगचे शिक्षण आणि दुसरीकडे गाण्याचा छंद जपत जपत ते गाणे हेच सर्वस्व होण्याची वेळ आली.
मात्र उच्चशिक्षणासाठी जाताना संगीत हे पार्ट टाईम बनले. मात्र गाणे लोकांपर्यंत यावे यासाठी विविध विद्यापीठातल्या संगीताचे विशेषतः पाश्चत्य संगीतातल्या नोटेशन प्रमाणे भारतीय संगीत बसवून त्याचे काही प्रयोग त्यांनी केले. तिथे पाश्चात्य आणि भारतीय अशा दोन्ही नोटेशनमध्ये शास्त्रीय संगीताचा बेस ऐकण्यासाठी तरूण वर्ग उत्सुक दिसायला लागला.
काही दिवस चाकरी केल्यावर तिथे मन रमेना. मग नोकरी सोडून केवळ गाण्यावर जगायचे ठरविले. अर्थात पत्नीचा सपोर्ट होताच. पण आजही एवढा शिकलेला मुलगा केवळ संगीतावर किती दिवस काढणार असा सवाल केला जातो. तरीही संगीत विद्या शिकविण्याचा मनाशी निर्धार केला. विविध विद्यापीठातल्या संगीत मैफलीत व्होकल म्यूझिकसाठी खास वेळ मागून घेतला. त्याच्या आधारे भारतीय दाक्षिणात्य संगीत कसे आहे याचे स्वरज्ञान ऐकविले. यामुळे प्रात्यक्षिक करून आपले भारतीय संगीत ऐकण्याची गोडी निर्माण करण्यात त्यांना यश आले.

भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्याची ओढ मराठी घरातल्या मुलात निर्माण होऊ लागली. आणि मग संगीतोत्सुक मित्रांकडून संगीत शिकण्यासाठी कधी येऊ अशी विचारणा सुरू झाली.
सांटाबारबारातल्या व्होकलच्या प्रात्यक्षिकातून एक खास वर्ग निर्माण झाला. त्यातूनच उल्हास बापट यांनी संतूर वादनाचा शिकागोमध्ये कार्यक्रम केला. तिथे उल्हास बापट यांची लोस अन्जेलेसला भेट झाली. त्यांच्या शिफारशीमुळेच महेशला शिकागोत कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. आणि मग हळूहळू एकातून दूसरा असे कार्यक्रमांचे जाळे विस्तारत गेले.
बी एम एमच्या २००५ च्या अटलांटा इथल्या कार्यक्रमात प्रेक्षकांना महेश काळे यांच्या गाण्यामुळे त्यांची गायक म्हणून ओळख पटली. २००७ च्या सिएटलच्या अधिवेशनात मुख्य दालनात सुमारे ३ ते ४ हजार श्रोत्यांसमोर उस्ताद झाकीर हुसेन यांचा अगोदर कार्यक्रम असल्यामुळे पूर्ण गर्दी जमली होती. गाण्याची मिळालेली संधी महेश काळेंचे नाव ओठाओठी होण्यास पुरेशी ठरली.
डेट्राईटच्या एका कार्यक्रमात उपस्थित असलेल्या हार्वर्ड विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने हार्वर्ड विद्यापिठावर होणा-या lec dem चा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात महेश काळेंना
आर्टिस्ट ऑफ दि मंथ मध्ये feature केले.
गाणे ऐकायचे कसे याचे प्रात्यक्षिक करून भारतीय संगीत ऐकायला लावण्याचे कसब महेश काळेंनी हस्तगत केले. आज महेश काळे हे नाव अमेरिकेत शास्त्रीय संगीत आणि उपशास्त्रीय संगीत गाणारा आणि ते तितक्याच ताकदीने शिकवणारा एक कलावंत म्हणून नावाजले जात आहे. त्यांनी परदेशात भारतीय संगीत रुजविले. पाश्चात्य भाषेत रागांचे, बंदीशींचे वैशिष्ट्य सांगून भारतीय संगीताच्या प्रसाराचे ध्येय बाळगले. आज महेश काळे अभिमानाने मराठीपणाच्या ताठ बाण्याने पाय रोऊन तिथे उभे आहेत.
त्यांच्या यशोगाथेत त्यांच्या पत्नीचा पूर्वाश्रमीच्या पूर्वा गुजर ह्यांचाही मोलाचा वाटा आहे. महेश काळेच्या आगामी वाटचालीसाठी तमाम भारतीय संगीतावर प्रेम करणा-या रसिकांचे बळ पाठीशी आहे.
त्यांच्या या कारकीर्दीला आणि संगीतसेवेच्या या कार्याला ग्लोबल मराठीच्या मनापासून शुभेच्छा!